दलितमित्र दादा पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे एक निष्ठावंत अनुयायी होते.
१९४८ मध्ये अहमदनगर येथे दादा पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली.
कर्मवीर अण्णांचे शिक्षण विषयक विचार ऐकून दादा पाटील भारावून गेले.
कर्जत येथे रयत शिक्षण संस्थेची शाखा सुरु करावी, त्यासाठी लागणारी मदत देण्यास आम्ही तयार आहोत,
असे दादा पाटलांनी कर्मवीर अण्णांना अभिवचन दिले. दादा पाटलांची शिक्षण विषयक तळमळ, त्याग व कष्ट
करण्याची तयारी लक्षात घेऊन १९४९ साली कर्जत येथे महात्मा गांधी विद्यालय सुरु करण्यास अण्णांनी मान्यता दिली.
रयत शिक्षण संस्थेची अहमदनगर जिल्ह्यातील हि पहिली सुरुवात यानंतर दादा पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाखा
अहमदनगर जिल्ह्यात सुरु करण्यासाठी मोठे योगदान दिले.
महात्मा गांधी विद्यालय उभारणीसाठी दादा पाटलांनी स्वतःचा संसार सोडून या शैक्षणिक कार्यास पूर्ण वाहून घेतले.
मात्र पुढे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गैरसोय होऊ लागली. ग्रामीण भागातील गरीब कुंटुंबातील मुलांना उच्च
शिक्षणासाठी नगर, पुणे, सातारा या ठिकाणी जाणे आर्थिकदृष्टया परवडणारे नव्हते. तेव्हा कर्जत येथेच महाविद्यालय
सुरु करण्यासाठी दादा पाटलांनी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयन्तांना यश येऊन जून १९६४ मध्ये कर्जत कॉलेजची
स्थापना झाली. महाविद्यालयाच्या उभारणीसाठी दादा पाटलांनी गावे, वाड्या, वस्त्यावर जाऊन धान्य व देणग्या गोळा केला.
त्यांची हि प्रचंड मेहनत व त्याग लक्षात घेऊन कर्जत कॉलेजला दादा पाटलांचे नाव द्यावे अशी जनतेतून मागणी जोर धरू लागली.
संस्थेने हि मागणी मान्य केली. दिनांक २२ सप्टेंबर १९८० रोजी कर्मवीर जयंतीच्या दिवशी रयत शिक्षण संस्थेचे तत्कालीन
अध्यक्ष व भारताचे उपपंतप्रधान मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व संस्थेचे
अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नामांतर सोहळा होऊन कर्जत कॉलेजचे नाव दादा पाटील महाविद्यालय
असे करण्यात आले. दादा पाटलांची शैक्षणिक व सामाजिक तपश्चर्या लक्षात घेऊन २६ मार्च १९७५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या
समाज कल्याण विभागाकडून दादा पाटलांना दलितमित्र म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एकही पैसे मोबदला न घेता
तळागाळातील समाज घटकासाठी राबणारा, रयत शिक्षण संस्थेची सेवा करणारा एक खरा - सच्चा रयत सेवक म्हणजे दलितमित्र
दादा पाटील हे होत.