देशाचे भविष्य तरुण मतदारांच्या हाती- गुरु बिराजदार (तहसीलदार, कर्जत)
दादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा
रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय व तहसील कार्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन विविध उवक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्जतचे तहसीलदार श्री. गुरु बिराजदार, नायब तहसीलदार योगेश जाधव, प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच लालासाहेब भोसले, विनायक जाधव, भैरव खांडेकर, संजय घुले, ज्ञानेश्वर कदम, कैलास संसोड हे कर्जत तहसील कार्यालयाचे सेवक तसेच महाविद्यालयाचा सेवाकवर्ग व विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
राष्ट्रीय मतदार दिन हा भारतात दरवर्षी २५ जानेवारीला साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकशाही प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग वाढवणे, मतदानाचे महत्त्व समजावून सांगणे आणि विशेषतः तरुण मतदारांना प्रोत्साहन देणे हा आहे. या दिवशी विविध शाळा, महाविद्यालयात व सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्त महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी 'मजबूत लोकशाहीसाठी मतदान करा' या ब्रीदवाक्याला अनुसरून जनजागृतीपर पथनाट्य सादर करून महाविद्यालयातील विद्यार्थी मतदारांना प्रबोधनपर संदेश दिला.
रॅली व मतदार शिक्षणाचे उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात आले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कर्जतचे तहसीलदार गुरु बिराजदार, प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यानिमित्त तहसीलदार श्री गुरु बिराजदार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाविद्यालयातील विद्यार्थी हा भविष्यातील जागरूक मतदार असणार आहे. तरुण मतदार सर्वाधिक असल्याने देशाचे भविष्य तरुणांच्या हाती असलेले लक्षात येते. भयमुक्त वातावरणात व कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करून देशाचे सार्वभौमत्त्व अबाधित राखण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, मतदार हा देशाचा राजा ठरवू लागला आहे. आजचा राजा मतपेटीतून जन्माला येतो आहे. देशाचे भविष्य व भवितव्य हे तरुणांच्या हातात आहे. जगातील क्रांत्या ह्या तरुणांनीच घडवलेल्या आहेत.
यानिमित्त उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ दिली. फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल रसायनशास्र विभागाचा संकेत सूर्यवंशी, गांधी विचार संस्कार परीक्षेत नेहा नवनाथ आटोळे-द्वितीय व शिवानी परमेश्वर घोगरे-तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन एन. सी. सी. विभाग प्रमुख मेजर डॉ. संजय चौधरी, एन. एस. एस. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास रोडगे, महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर डॉ. दत्तात्रय शेंडे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांच्या विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर डॉ. संजय चौधरी, आभार डॉ. विकास भोसले तर सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी केले.